मुंबई - राजधानीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेने व राज्य सरकारने क्वारंटाइन करण्यासाठी एक लाख खाटांचे सेंटर उभारले. त्यासाठी मैदाने देखील ताब्यात घेतली. यात वानखेडे स्टेडियमसह मुंबई नेस्को मैदान, बिकेसीचा समावेश आहे. याठिकाणी हजार खाटांची सोय करण्यात आली आहे, असे सरकारने सांगितले. मात्र, रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मग राज्य सरकारने व पालिकेने नेस्को आणि बिकेसी मुंबईत उभारलेल्या खाटा गेल्या कुठे? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच सरकार त्यांनी केलेल्या कामाच्या घोषणा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांचे हाल होत आहेत. "वा रे ठाकरे सरकार", असे म्हणत सोमय्या यांनी पालिका व राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.
पालिकेने रुग्णांसाठी गोरेगाव नेस्को येथे 3000 खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभे केले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी फक्त 315 खाटांचा वापर होत आहे. तसेच बांद्रा बीकेसी येथे 1,087 खाटांचे नियोजन करण्यात आले. तेथेही फक्त 315 खाटांचा वापर होत आहे. जर पालिकेने व राज्य सरकारने हजारो खाटांचे नियोजन केले आहे, तर मग रुग्णांची गैरसोय का होत आहे, असा सवालदेखील सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात हजारो खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले असल्याचे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. एकीकडे रुग्णालयात एका बेडवर दोन दोन रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती आहे. असे असताना, दुसरीकडे क्वारंटाइन सेंटरमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत. मग या उर्वरीत खाटांवर सरकार रुग्णांना उपचार का देत नाही? असा सवाल उपस्थित करत सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.