मुंबई : महात्मा गांधींच्या खादी अभियानातून अनेकांना रोजगार मिळतो. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने खादीला पुनरुज्जीवीत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील खादीची जपणूक आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे. खादीच्या कपड्यांना अधिकाधिक मागणी आहे, मात्र तेवढा पुरवठा होत नाही, तरुणांमध्ये विशेषतः खादी लोकप्रिय व्हावी. यासाठी फॅशन डिझायनर यांची मदत घेऊन तशा पद्धतीने कपडे तयार केले जाणार आहे. त्यामुळे आता महात्मा गांधींची खादी आता फॅशनेबल होणार आहे.
तरुणांमध्ये खादी अधिक लोकप्रिय व्हावी, यासाठी तरुणांना आकर्षित करणाऱ्या डिझाईनमध्ये खादीचे कपडे तयार करण्याचा निर्णय खादी ग्रामोद्योग महामंडळाने घेतला आहे. - रवींद्र साठे
खादी उद्योगाला प्रोत्साहन : खादीच्या प्रोत्साहनासाठी देशातील अन्य राज्यांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग मंडळाला मदत केली जाते. मात्र महाराष्ट्र सरकारने ही मदत योजना 2016 17 नंतर बंद केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारला जर मदत मिळाली, तर निश्चितच त्याचा फायदा खादीच्या कपड्यांची किंमत कमी करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही मदत मिळावी आणि खादीच्या कपड्यांचे उत्पादन करण्यासाठी त्याचा अधिक लाभ होईल, असेही साठे यांनी सांगितले. राज्यातील खादी निर्माण करणाऱ्या कामगारांना दिवसा केवळ तीनशे रुपये मजुरी मिळते. मात्र केरळ सरकार कामगारांना अनुदान देते, अशा पद्धतीची अनुदान योजना जर राज्यात राबवली गेली, तर त्याचा खाली उत्पादनाला अधिक फायदा होईल. सर्व स्तरातील लोक खादीचा वापर करू शकतील, असेही साठे यांनी सांगितले.
पुण्यात होणार खादीचे संग्रहालय : दरम्यान खादीच्या नवीन धोरणानुसार पुणे शहरात खादीचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात येणार आहे. खादीसाठी समर्पित असलेले हे देशातील पहिले केंद्र असणार आहे. यामध्ये कापसापासून खादी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. खादीच्या इतिहासाची माहिती आणि छोटेसे थेटर ही या ठिकाणी असणार आहे. तसेच खादीच्या कपड्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक सभागृह, प्रशिक्षण कक्ष, उपाहारगृह अशा सर्व सोयी सुविधा या संग्रहालयात करण्यात येणार आहेत. तसेच या संग्रहालयाला भेट देणाऱ्या व्यक्ती चरखा चालवण्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :