मुंबई - पर्यटकांना मुंबईतून काशिदला जाण्याकरिता सध्या चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. आता हा कालावधी अवघ्या दोन तासावर येणार आहे. कारण सागरी महामंडळाकडून काशिद बंदरावर ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याचं काम सुरू झाले आहे. यावर्षाच्या अखेरीस त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे,अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.
112 कोटींचा खर्च-
समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी 2018 ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याकरिताचा हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाला पाठवविण्यात आलेला होता. त्याला मंजुरी सुद्धा पर्यावरण विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर काही तांत्रीक अडचणीमुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. तसेच कोरोनामुळे सुद्धा या प्रकल्पाचे काम लांबणीवर गेले होते. मात्र आता कामाची सुरुवात झाली असून यावर्षाच्या अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस सागरी महामंडळाचा आहे.
760 मीटर लांबीची ब्रेकवॉटर वॉल
सागरी महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागाने ईटीव्ही भारतला दिलेल्या माहितीनुसार, सागरमाला प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे काशिद हे ठिकाण मुंबईशी जलमार्गानेही थेट जोडले जाणार आहे. काशिद येथे 760 मीटरची ब्रेकवॉटर वॉल बांधण्याचे काम सुरू आहे. आगोदर याब्रेकवॉटर वॉलच्या बांधकामाचा खर्च 98 कोटी रुपये इतका होता. मात्र काम लांबणीवर गेल्यामुळे यांच्या खर्च 112 कोटी रुपये इतका झाला आहे.
पर्यटकांचा वाचणार वेळ-
सद्यस्थितीत मुंबईवरून काशिदला जाण्यासाठी मुंबईकरांना अलिबाग मार्गे रस्त्यानेच जावे लागते. खराब रस्ते, वाहतूककोंडीचा त्रास यामुळे या प्रवासात तब्बल 4 ते 5 तासाचा कालावधी लागतो आणि तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने पर्यटक काशिदला जाणे टाळतात. या प्रकल्पामुळे सागरी मार्गाने जाण्याकरिता फक्त 2 तास लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळ सुद्धा वाचणार आहे. तसेच काशिदला परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून पर्यटकांना सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.