मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतला आता राजस्थानातील करणी सेनेने सुरक्षेचे आश्वासन दिले असून कंगनाची सुरक्षा करण्यासाठी करणी सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असे मुंबई करणी सेनेचे अध्यक्ष जीवनसिंह सोलंकी यांनी म्हटले आहे.
अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू असून कुणाच्याही विरोधाला न जुमानता मुंबईत येणार असल्याचे कंगना हिने सांगितले आहे. येत्या 9 सप्टेंबरला कंगना हिमाचल प्रदेशातील मनाली येथून मुंबई विमानतळावर उतरणार आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तसेच राहण्यासाठी मुंबई सुरक्षित नसून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कंगनाच्या या आक्षेपार्ह ट्विटवर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच शिवसेनेने कंगनाच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलने केली होती. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील, असा इशारा सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता. हे प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली आहे. दरम्यान, कंगना रानौत विरोधात शिवसेना तर, बचावासाठी आरपीआयनंतर आता करणी सेनाही मैदानात उतरली आहे. कंगनाला सुरक्षा देण्याचे आदेश करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामनी यांनी आम्हाला दिले असल्याचे मुंबई करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकी यांनी सांगितले.
हेही वाचा - धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी रामदास आठवले उतरणार रस्त्यावर