मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने काल (बुधवार) अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई केली होती. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयाने कंगना रणौतच्या वकिलांना याचिकेत दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा- 'मोदीजी तुमच्या खास मित्रांना सरकारी कंपन्या देणे बंद करा'
कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी 3 वाजता सुनावणी पार पडली. न्यायालयाने कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांना याचिकेत अनेक दुरुस्त्या करण्यास सांगितले. याप्रकरणी याचिका घाईत दाखल केलेली आहे, थोडा वेळ घेऊन पुन्हा फाइल करा, असे न्यायालयाने कंगनाच्या वकिलांना सिद्दीकी यांना सांगितले. 22 सप्टेंबरपर्यंत कार्यालयात काहीही तुटणार किंवा जोडले जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कंगनाचे कार्यालय निवासी क्षेत्र नाही. आधी हा बंगला होता, नंतर कंगनाने तो विकत घेतला आणि कार्यालय बनवले, असे सिद्दीकी यांनी न्यायलयात सांगितले. महापालिका आणि रिझवान सिद्दीकी यांना या प्रकरणी कोणतीही घाई नाही, असे न्यायालयाने म्हटले. रिझवान सिद्दीकी यांनी याचिका व्यवस्थित तयार करावी, त्यानंतर त्यावर महापालिका उत्तर देईल, असेही न्यायालयाने सांगितले. निवासी क्षेत्रात कार्यालय सुरू करण्यासाठी कोणती परवानगी घेण्यात आली होती, याची माहिती आता कंगनाच्या वकिलांना न्यायालयासमोर सादर करावी लागणार आहे.