मुंबई - मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अभिनेत्री कंगना रणौत ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई महापालिकेने तिला बेकायदेशीर बांधकामाबद्दल नोटीस पाठवली व त्यानंतर काल पालिकेने तिचे कार्यालय तोडले. या घटनेनंतर कंगना रणौत हिने आज आपल्या मणिकर्णिका या कार्यालयाला भेट दिली.
पालिकेने कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर कंगनाने हे प्रकरण उच्च न्यायालयात खेचले. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, आज कंगना हिने आपल्या कार्यालयात जाऊन तोडफोडीची पाहणी केली. यावेळी पुराव्यासाठी तिने काही फोटो देखील घेतले. त्यानंतर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत ती आपल्या घराकडे रवाना झाली.
काल कार्यालयाच्या तोडफोडीनंतर कंगनाने संतापून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर नेते काय, सामान्य काय साऱ्यांनी याप्रकरणी समिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता आहे. कार्यालयानंतर कंगनाच्या खार येथील घरावर पालिकेची नजर आहे. तिच्या घराच्या पाचव्या मजल्याचे प्रकरण दिंडोशी न्यायालयात दाखल आहे. या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा- बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर