मुंबई- पत्रकार जे.डे हत्याकांड प्रकरणी सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या दोष मुक्तीला सीबीआयकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ज्यावर मंगळवारी सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने जिग्ना व्होरा हिला जे. डे हत्याकांडातून निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवले आहे.
काय आहे प्रकरण-
वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची ११ जून २०११ रोजी भरदिवसा पवई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने 14 दिवसांत प्रकरणाचा छडा लावत 7 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली. एका आरोपीला म्हणजेच छोटा राजनला सीबीआयने अटक केली. गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने याप्रकरणी तपासाअंती ५ ऑगस्ट २०१६ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपींवर आरोप निश्चित केले होते. सरकारी व बचाव पक्षाकडून साक्षी पुरावे नोंदवण्यात आले होते.
या प्रकरणातील जन्मठेप झालेले दोषी आरोपी-
1) सतीश थांगपन उर्फ सतीश काल्या - जेडे यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग, खून करण्यासाठी लागणाऱ्या पिस्तूलाने गोळ्या झाडल्या, छोटा राजन यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी आरोपींना आतंराष्ट्रीय सिम कार्ड उपलब्ध करुन देणे, हत्येच्या तयारीसाठी माणसं जमविणे, खुनाच्या दिवशी जे.डे. यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करणे.
2 ) अनिल भानुदास वाघमोडे - जे.डे. यांच्यावर गोळी झाडणाऱ्या सतीश काल्या यांच्या संपर्कात राहून हत्येसाठी मोटारसायकल उपलब्ध करुन देणे, खुनानंतर छोटा राजन यांच्याकडून पैसे घेतले, खुनाच्या दिवशी सतीश काळ्या सोबत घटनास्थळी हजर.
3 ) अभिजित काशिनाथ शिंदे- खुनाच्या दिवशी स्वतः मोटार सायकल चालवीत जे.डे. यांचा पाठलाग केला, सतीश काळ्या याने जे.डे. यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याच्याकडील पिस्तूल आपल्या ताब्यात घेऊन निलेश शेडगे या आरोपीस जोगेश्वरी हायवेपर्यंत मोटारसायकल वरुन नेले.
4 ) निलेश शेडगे उर्फ बबलू - गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग, घातस्थळी स्वतः हजार राहून जे.डे. यांचा पाठलाग केला होता, गुन्ह्यानंतर २५ हजार स्वीकारले.
5 ) अरुण जनार्दन डाके- ७ जून २०११ रोजी सतीश काळ्या याच्या सांगण्यावरुन आरोपी अनिल वाघमोडे याच्या सोबत उमा पॅलेस बार मुलूंड येथे जाऊन आरोपी विनोद सरानी उर्फ विनोद चेंबूर यास भेटण्यास आलेल्या जे. डे. यांच्या निवास्थानाच्या परिसरात पाळत ठेवली. या आरोपीच्या मोटारसायकल वर सतीश काल्या बसला होता.
6 ) मंगेश आगवणे - आरोपीने आरोपी अरुण डाके याच्या सांगण्यावरुन गुन्ह्यात सहभाग घेतला. गुन्ह्यासाठी मोटार सायकल पुरविली. यांच्यासाठी १० हजार स्वीकारले. घटनेच्या दिवशी स्वतः हजार होता.
7 ) सचिन सुरेश गायकवाड - घटनेच्या दिवशी पाठलाग करुन जीप चालविली होती.
8 ) दीपक दलवीरसिंग सिसोदिया -आरोपी नयनसिंग बिस्ट यास जिवंत काडतुसे उपलब्ध करुन दिली.
9 ) छोटा राजन- , संघटित टोळीचा म्होरक्या, छोटा राजनच्या आदेशावरुन जे.डे. यांची हत्या, हत्येनंतर आरोपींना पैसे दिले.