मुंबई - मुंबईत वाढलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेचे जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. 1 हजार 650 बेडची व्यवस्था असलेल्या मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतला आमच्या 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला काँग्रेसकडून हरताळ! तर 50 लोकांच्या वर प्रवेश नाही - नाना पटोले
1 हजार 650 बेड क्षमता असलेल्या मुलुंड जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना कमी झाल्याने सध्या फक्त अडिचशे खाटा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे आता उर्वरित आयसीयू सेंटर्स, तसेच जनरल वॉर्डसुद्धा कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे. दिवसाला तीस ते चाळीस रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखिल वाढविण्यात आला आहे.
कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झाला नाही, याचे भान ठेवावे
मुलुंड जम्बो केअरमध्ये आयसीयू बेडचीसुद्धा पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, तेव्हा बेड सेवा तात्पुरती कमी केली होती. आता पुन्हा कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हे सेंटर पूर्ण बेड संख्येने कार्यरत करण्यात येत आहे. जर समजा रुग्णांची संख्या वाढली, तर त्यांना येथे दाखल करून घेऊ, अशा प्रकारची तयारी येथे करण्यात आलेली आहे. नागरिकांनी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झाला नाही याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. गर्दीत जाणे टाळले पाहिजे, असे मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख प्रवीण आंग्रे यांनी सांगितले.
मुलुंड कोविड सेंटरबद्दल थोडक्यात
पूर्व मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या परिसरात मुबई महानगरपालिकेतर्फे 1 हजार 650 बेडची जम्बो कोविड केअर फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे सेंटर आहे. यात तब्बल 500 हून जास्त ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी 26 हजार लिटर ऑक्सिजन बँकची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड असलेले हे पहिलेच सेंटर आहे.
विशेष म्हणजे, हे कोविड केअर सेंटर संपूर्णपणे वातानुकूलित आहे. सेंटरमध्ये कॉन्टॅक्टलेस स्क्रिनिंग सेंटर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी मार्गिका, तसेच डेडिकेटेड वाय-फाय सुविधा देखील रुग्णांसाठी देण्यात आली आहे. सोबतच गरम आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील या सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - गणेशोत्सवानंतर केलेल्या कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका पुन्हा सज्ज