मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित जे जे रुग्णालयात मागील चार दिवसापासून मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. डॉक्टर रागिणी पारेख व डॉक्टर तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली होती. अखेर शनिवारी सरकारने डॉक्टर रागिणी पारेख व डॉक्टर तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करण्याचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर आज हा संप मागे घेण्यात आला आहे.
आमच्या तीन प्रमुख मागण्यांसाठी आम्ही संपावर होतो. डॉ. तात्याराव लहाने व रागिणी पारेख यांचे योगदान नाकारता येण्यासारखे नाही. परंतु शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, यांनी आमचे म्हणणे एकून घेत तोडगा काढला आहे. येथील २५ वर्ष सुरू असलेल्या हुकुमशाहीचा अंत झाला आहे. - मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे
मागण्या मान्य झाल्यावर संप मागे : वैद्यकीय आयोगाच्या विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. तसेच पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे थकित विद्यावेतन देण्यात यावे. सोबतच तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकित देणी लवकर देण्यात यावीत, अशी मागणी करत मागील चार दिवसांपासून डॉक्टर संपावर होते. अखेर आज या मागण्या मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला आहे.
तोडगा काढल्याप्रकरणी सर्वांचे आभार : मार्डचे अध्यक्ष डॉक्टर शुभम सोनी यांनी या संपाबाबत बोलताना सांगितले आहे की, मागील चार दिवसंपासून आमच्या मागण्यांसाठी आम्ही संपावर होतो. याबाबत आमची मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत बैठक झाली. अखेर आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आहे. पदभरती सुद्धा टप्याटप्याने भरण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिले आहे. आमच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढल्याप्रकरणी आम्ही सर्वांचे आभार मानतो. तसेच आम्ही आजपासूनच संप मागे घेत असून आम्ही पुन्हा कार्यरत होत आहोत.
हेही वाचा :
- Ajit Pawar on Doctor Strike: जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप: राज्य शासनाने तात्काळ लक्ष द्यावे- अजित पवार
- Doctors Strike Thane छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात सामील
- J J Hospital : आश्चर्यजनक! जे जे रुग्णालयाच्या 130 वर्षे जुन्या इमारतीत सापडले भुयार