मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसापूर्वी 72 तासाच्या आत 2 गुन्हे दाखल झाले होते. याचाच आधार घेत जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करून ठाण्यामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रण आहे. मात्र आपण गेलो तर पोलीस आपल्यावर पाकीट मारीचा गुन्हा दाखल करतील असे खोचक ट्विट केले आहे. ठाणे महानगरपालिकेत काही कामांच्या शुभारंभचा कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच कार्यक्रमांसाठी जितेंद्र आव्हाड यांना देखील आमंत्रित करण्यात आल आहे.
जितेंद्र आव्हाडाचे खोचक ट्विट: काही दिवसापूर्वी कळवा मुंब्रा ब्रिजच्या उद्घाटना वेळी आपण गेलो असता, आपल्यावर 354 हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर आज आपण मुख्यमंत्र्यांच्या बाजूला या कार्यक्रमाच्या दरम्यान उभे राहिलो, तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा आपल्यावर दाखल करतील. आणि आपल्यावर दबाव होता असं म्हणतील तर तुला माहित आहे ना, मी काहीच करू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतील.
मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा: त्यामुळे आपण कार्यक्रमाला न गेलेलेच बरं असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यामध्ये 72 तासाच्या आत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. या आंदोलनात ठाण्यामध्ये चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
राजकीय वातावरण तापलं: त्यानंतर कळवा मुंब्रा ब्रिजच्या उद्घाटना वेळी मुख्यमंत्री शेजारी असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केला असल्याची तक्रार ठाणे पोलिसात दाखल केली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासात दाखल झालेल्या 2 गुन्हामुळे महाराष्ट्रात चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या ठाणे महानगरपालिका कार्यक्रमाला आपण न गेलेलेच बरं असे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.