मुंबई - शरद पवार म्हणजे सह्याद्रीचा पहाड आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याने काहीही होणार नसून ते घाबरणाऱ्यातले नसल्याचे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. लोकांचे प्रेम हेच शरद पवार यांचे सुरक्षा कवच असल्याचे आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था काढली आहे. याच मुद्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपण भाजपला कदापि घाबरणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढली हे बरे झाले, कारण महाराष्ट्राला कळले की, केंद्र सरकार किती कोत्या मनोवृत्तीचे आहे. केंद्र सराकर हे खुनशी प्रवृत्तीचे असल्याचे आव्हाड म्हणाले.
फोन टॅपिंग की, विकृती
फोन टॅपिंग की, विकृती. भाजप सरकारने ही विकृती का केली याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच कोरेगाव भीमा हे षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले. दलित कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा भाजपचा कट असल्याचे आव्हाड म्हणाले. लोकांच्या खासगी जीवनात डोकावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ते म्हणाले.