मुंबई - शहरात जागेचा अभाव असताना मुलांना निसर्गाच्या जवळ जाण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यासाठी अभिनंदनास पात्र आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात २४ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्याविषयक कार्यशाळेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान खाते व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन आहे. जर निसर्गाची आवड जोपासली तर आपण घरच्या गच्चीवरसुध्दा झाडांची लागवड करु शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिका किती चांगल्याप्रकारे काम करते तसेच परमेश्वराने निसर्गाची किती अनमोल देणगी आपल्याला दिली आहे हे प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर खऱया अर्थाने कळते. त्याचप्रमाणे धारावीची ओळख ही झोपडपट्टी म्हणून आहे. परंतु येथे सुंदर औषधी झाडांचे निसर्ग उद्यानसुध्दा असून ते नागरिकांनी आवर्जून बघावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, की प्रदर्शन आणि कार्यशाळेत सहभागी सर्व संस्थाचे अभिनंदन करीत असून आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे तेसुध्दा अभिनंदनास पात्र आहेत. तर लहान मुले तसेच विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या ऋतूत कोणती झाडे, फळे, फुले येतात यांची माहिती देणारे माहिती फलक महापालिकेने लावावे, असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे गत २३ वर्षांपासून हे प्रदर्शन भरविण्यात येते. दरवर्षी प्रदर्शनात नाविण्यता असते. यावर्षीच्या ३ दिवसीय प्रदर्शनाची संकल्पना ही संगीत वाद्यांची आहे. या कल्पकतेचे नैसर्गिक संगीत वाद्य हे प्राधान्याने दिसून येत आहे. लहान मुलांना आपण ज्याप्रमाणे जोपासतो त्यांची काळजी घेतो, त्याप्रमाणे उद्यान विभागाने झाडे, फुले, फळे यांना जोपासून याठिकाणी आयोजित पुष्प प्रदर्शनात त्यांची मांडणी केली आहे. हे प्रदर्शन लहान मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केले.
या कार्यशाळेला ३ दिवसात सव्वा लाख नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्था व प्राधिकरणाच्या स्पर्धेत गोदरेज अँड बॉईजला प्रथम पारितोषिक व मध्य रेल्वेला द्वितीय पारितोषिक मिळाले. उपमहापौर हेमांगी वरळीकर व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे, सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर, परिक्षक हनुमंत राजे, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी या मान्यवरांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.