मुंबई - मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुस्तकांची गोडी लागावी, यासाठी प्रभादेवी येथील डॉ. जयश्री साठे-छेडा यांनी ग्रंथालय उभे केले आहे. यामध्ये जवळपास १५ हजार पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांच्यासोबत सर्व वयोगटातील सुमारे 650 वाचक सभासद त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामधून माफक दरात पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
जयश्री यांना लहानपणापासून पुस्तक वाचनाची आवड आहे. ही आवड इतरांमध्ये निर्माण व्हावी, असा विचार त्यांच्या मनात आला आणि 3 वर्षापूर्वी त्यांनी नॉलेज सेंटर नावाने ग्रंथालयाची स्थापना केली. सुरुवातीला १००० पुस्तकांच्या आसपास असलेली संख्या आता पंधरा हजाराच्या घरात गेली आहे. इंग्रजी आणि मराठी साहित्य येथे उपलब्ध आहे. दहा बाय दहाच्या जागेत सुरू झालेले हे पुस्तकांचे विश्व ज्ञानसागराने भरले आहे. पु. लं., अत्रे, कुसुमाग्रज, ढसाळ, गॉर्की, अगास्ता, शेक्सपिअर, मोल्सवर्थ, जे. के. रोलिंग, प्रेमचंद अशा अनेक नामांकित लेखकांची पुस्तके त्यांच्याकडे आहेत.
जयश्री लग्नानंतर मुंबई येथील प्रभादेवी येथे स्थायिक झाल्या. गेल्या २००५ मध्ये त्यांना मुलगा. त्यानंतर त्यांचा मुलगा धीर याच्यामुळे 'नॉलेज अॅक्टिव्हिटी सेंटर'चा प्रवास सुरू झाला. मुलाच्या कलेला वाव देणारे ठिकाण प्रभादेवीमध्ये त्या शोधायला लागल्या. लहान मुलांना रमता येईल, खेळता येईल, त्यामधून त्याला काहीतरी नवीन शिकता येईल, असे काही नव्हते. त्यांना लांबपर्यंत प्रवास करून त्याच्यासाठी काही अॅक्टिव्हिटी शोधाव्या लागत होत्या. तसेच त्यांना सुद्धा बालपणापासून वाचनाची आवड होती. त्यामुळे त्या मुलाला घेऊन पुस्तके बघायला फिरत होते. मग बुक स्टॉल असो किंवा रद्दीवाला. काही नवीन वाचायला मिळतेय काय? हे सतत त्या शोधत असायच्या. त्यानंतर त्यांचीच सवय त्यांच्या मुलाला लागली. त्यानंतर दोघे मिळून मग त्यांचा वेळ पुस्तक वाचनात, काहीतरी नवीन शोधण्यात घालवत होते. त्यामधून पुस्तके जमा झाली. त्याचे हळूहळू पुस्तकालयात रुपांतर झाल्याचे जयश्री सांगतात. तसेच पुस्तके वाचल्याने मेंदूला चालना मिळते असल्याचेही त्या म्हणाल्या.