मुंबई - झेंड्यापेक्षा विचार महत्वाचा आहे. त्यांच्या पक्षाचा कोणताही झेंडा असावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मनसेच्या झेंड्याबद्दल व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पूर्वीही भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. ती आजही कायम आहे असून ती उद्याही राहील असेही पाटील म्हणाले.
राज ठाकरे यांनी यापूर्वी मराठी माणसांच्या हक्कासाठी टोकाची भूमिका मांडली होती. नंतरच्या काळात त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याचे पाटील म्हणाले. तसे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे कशी चुकीची पावले टाकत आहेत, ते दाखवून दिले होते. पुढच्या काळातही त्यांची हिच भूमिका राहील. भाजपच्या विरोधातील त्यांची धार कमी होणार नसल्याचे पाटील म्हणाले.
मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना होणार असल्याची माहिती स्वागतार्ह आहे. अभ्यासपूर्ण विरोध होत असेल तर विचारांचे स्वागतच आहे. विरोधी पक्ष आंधळा नसावा. राज्याच्या प्रगतीसाठी काही गोष्टींना विरोध होत असेल तर ते चांगलेच असल्याचे पाटील म्हणाले.