मुंबई - आतापर्यंत जनधन खात्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून 8 हजार 857 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यात 1 कोटी 96 लाख 21 हजार 917 रुपे कार्डधारक खातेदार आहेत. लॉकडाऊन काळात सुरुवातीला काही ग्रामीण भागात बँकाची वेळ कमी करण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला काही प्रमाणात ते पैसे काढण्याला मर्यादा होती. मात्र, नंतर बँकांची वेळ वाढवण्यात आल्याने खातेधारकांना नियमित पैशांचे वाटप करण्यात आले आहे, असे राज्य स्तरीय बँकींग (SLBC) चे वरिष्ठ अधिकारी एस. जी. बर्वे यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका खूप महत्त्वाच्या भूमिका निभावतात. बँकांचे जाळे जितके विस्तारलेले असते तितकी अर्थव्यवस्था बळकट होते. यामुळेच बॅंका सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मात्र, अशा परिस्थितीतही देशातील एक जनसमुदाय या सेवेपासून वंचित होता. त्यासाठी भारत सरकारने 2014 साली जनधन अकाऊंट योजना सुरू केली.
30 कोटींहून जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जनधन अकाऊंटमुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तत्वावर सरकारच्या विविध योजनांचा निधी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा होऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेधारक महिलांना एप्रिल ते जून या तीन महिन्यात मासिक 500 रुपये मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांच्या जनधन खात्यात पैसे जमा झाले आहेत.
महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 78 लाख 20 हजार 917 जनधन खातेधारक आहेत. यापैकी ग्रामीण आणि निमशहरी भागात 1 कोटी 44 लाख 76 हजार 784 तर मोठ्या शहरात 1 कोटी 33 लाख 44 हजार 133 खातेधारक आहेत.
जनधन खातेधारकांना रूपे, एमटीएम कार्डही देण्यात आले आहे. यामुळे त्यांना इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढता येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर किसान कल्याण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत देण्यात येते. त्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. काही खातेधारकांचे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते, अशा खातेधारकांना ही इतर ओळख पात्रांच्या आधारावर मदतीची रक्कम देण्यात आल्याचे बर्वे यांनी सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत किती रकमेचे वाटप करण्यात आले त्याचा आढावा घेणे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.