मुंबई - मालेगाव येथे सप्टेंबर २००८ रोजी मुस्लीम बहुल असलेल्या परिसरात स्फोट झाला होता. शहरातल्या भिक्कु चौकात एका हिरो होंडा मोटार सायकलचा त्यासाठी वापर करण्यात आला होता. यात ७ जणांनी आपला प्राण गमावला होता. सुरुवातीला हा सिलिंडर ब्लास्ट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलीस तपासात हा बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या घटनेचा तपास करण्यात आला होता. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, माजी मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु एटीएसकडून एनआयएसारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाची सूत्रे गेल्यानंतर मालेगाव स्फोटातील आरोपींवर लावण्यात आलेले मकोका कायद्याचे कलम आश्चर्यकारकरित्या हटविण्यात आले.
राज्यातील मालेगावमधील भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात मकोका कायद्याखाली आरोप काढून घेतल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एनआयए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ज्यामध्ये तिने स्तनाचा कर्करोग असल्याचे कारण सांगून जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी एनआयए तपास यंत्रणेकडून फारसा विरोध न झाल्याने साध्वीच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.
यासंदर्भांत काही महिन्यांपूर्वी एनआयए कोर्टात न्यायमूर्ती टेकाळे यांच्यापुढे मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात सुनावणी सुरु होती. यादरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा एनआयएने केला होता. मात्र, न्यायमूर्ती टेकाळे यांनी एनआयएचा हा दावा फेटाळून लावला होता. यासंदर्भात ब्लास्ट घडविताना मोटारसायकलचा वापर केला जाणार असल्याचे साध्वी प्रज्ञा यांना माहित असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
साध्वी प्रज्ञा, प्रसाद पुरोहित, यांच्यासह ७ आरोपींविरोधात दहशतवाद व कट रचण्याचे आरोप तत्कालीन न्यायमूर्ती टेकले यांनी कायम ठेवले होते. मात्र, त्यावेळी साध्वीवरील मकोका कायद्याखालील आरोप मात्र वगळण्यात आले होते. याप्रकरणातून न्यायमूर्ती टेकले यांची बदली झाल्यानंतर सध्या या प्रकरणाची सुनावणी युएपीए कायद्याअंतर्गत एनआयए कोर्टात न्यायमूर्ती पडालकर यांच्या कोर्टात सुरु आहे. दरम्यान २०१७ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला होता.
- एटीएसच्या तपासात समोर आलेले मुद्दे-
- साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह एकूण १४ जणांवर २००८ साली आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांनी रामचंद्र कलसंगर व संदीप धगे या आरोपींना स्फोट करण्यासाठी मोटारसायकल पुरवली होती.
- ब्लास्टसाठी वापरण्यात येणारा दारुगोळा साध्वीने आणखी एका व्यक्तीकडून पुरविला होता. ब्लास्ट घडवण्याआगोदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी २००८ मध्ये भोपाळ येथे एका मीटिंगमध्ये ब्लास्ट घडविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींच्या जबाबदारीसह मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे एटीएस तपासात समोर आल्याने आरोपपत्रात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे.
- २०११ मध्ये एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या पूरक आरोपपत्रात या याप्रकरणात सर्व आरोपींवर मकोका कायद्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये ब्लास्टसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल ही साध्वी प्रज्ञा सिंहच्या नावावर असल्याचे म्हटले आहे.
- साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विरोधातील मकोका कलम हटविण्यात आल्यानंतर यूएपीए कायद्याअंतर्गत कलम १६, कलम १८, स्फोटक पदार्थ कायदा १९०८च्या कलम ३,४,५,६ यासह आयपीसीच्या विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दरम्यान या प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सर्व आरोपींवर यूएपीए अंतर्गत विशेष एनआयए न्यायालयात खटला दैनंदिन स्वरूपात सुरू आहे.