मुंबई :प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी मुकेश अंबानी यांनी गणपती बाप्पाची विधिवत पुजा करून बाप्पाचे आशिर्वाद घेतले. आज मुकेश अंबानी आपला ६६ वां वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी मुकेश अंबानी यांचे स्वागत केले व त्यांना गणरायाची मुर्तीही भेट दिली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सुनिल पालवे, नंदा राऊत आणि सुनिल गिरी आदी उपस्थित होते. मुकेश अंबानी यांनी यावेळी सिद्धीविनियक ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली.
अंबानी सिद्धिविनायकांच्या चरणी : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यापूर्वी सुद्धा पत्नी नीता अंबानी पूत्र आकाश व अनंत यांच्यासोबत सहकुटुंब सिद्धिवानयाच्या चरणी नतमस्तक झाले होते. तेव्हा मोठा मुलगा आकाश अंबानी याची लग्नपत्रिका गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ते आले होते.
आकाश अंबानी याने हिरे व्यापारी रसैल मेहता यांची लहान मुलगी श्लोका हिच्याशी विवाह केला आहे.
आकाश व श्लोका हे दोघेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून शिकले असून दोघेही बालपणापासून मित्र आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत : मुकेश अंबानी हे पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून त्यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या २०२३ यादीत प्रसिद्ध अब्जाधीशांमध्ये ९ व्या स्थानी झेप घेतली आहे. मागच्या वर्षी २० सप्टेंबर रोजी उद्योगपती गौतम अदानी यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेच २४ सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट जवळपास दीड तास चालली होती पण यातील तपशील समोर आला नव्हता.