मुंबई : भारतातील अनेक गुन्हेगार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परदेशात लपून बसल्याचे माहिती मिळताच इंटरपोल ही तपास यंत्रणा त्या गुन्हेगाराविरोधात नोटीस बजावते. अशाच प्रकारे केरळ येथे तेरा वर्षीय भाचीवर 2015 मध्ये बलात्कार करून सौदी अरेबियाला पळून गेलेल्या आरोपी सुनील कुमार भद्रनला इंटरपोलच्या नोटीसीनंतर सौदी अरेबियातून केरळला आणण्यात आले होते. या घटनेत जून 2017 ला पीडित मुलीने सरकारी महिला मंदिरात रेस्क्यू होममध्ये आत्महत्या केली. दरम्यान केरळ पोलीस आंतरराष्ट्रीय तपास एजन्सी सौदी अरेबिया पोलिसांन बरोबर काम करत होते. इंटरपोलने नोटीस काढली होती. या प्रकरणामध्ये केरळच्या तेव्हाच्या डीसीपी मेरीन जोसेफ यांनी सौदी अरेबियाला जाऊन आरोपी सुनील कुमार भद्रनच्या मुसक्या आवळल्या होत्या.
इजिप्त मधून पोलिसांनी जेरबंद केले: ई पोलीस दलाच्या वॉन्टेड लिस्टमध्ये असलेला विपुल मनुभाई पटेल याला देखील इंटरपोलच्या रेड कॉर्नर मध्ये 2022 मध्ये भारतात आणण्यात आले. मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला मुंबईत आणले. फरार आर्थिक गुन्हेगार असलेल्या निरव मोदीच्या प्रकरणात सीबीआयला पाहिजे असलेला आरोपी सुभाष शंकर परब त्याला देखील इंटरपोलच्या सूचनेनंतर एप्रिल 2022 मध्ये इजिप्तमधून पोलिसांनी जेरबंद केले होते. त्याशिवाय गँगस्टर सुरेश बसप्पा पुजारी याला सुद्धा इंटरपोलच्या मदतीने फिलिपिन्समधून डिसेंबर 2021 मध्ये भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. सुरेश पुजारी याला मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाकडे सोपवण्यात आले. निरनिराळ्या 15 गुन्हांमध्ये सुरेश पुजारी हा मुंबई पोलिसांना वॉन्टेड होता. क्रिकेट मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपी संजीव सावलाला देखील इंटरपोलणे रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सावलाला फेब्रुवारी 2020 मध्ये ताब्यात घेतले होते.
भारताने 93 इंटरपोल नोटीस बजावल्या: खंडणी प्रकरणात वॉन्टेड असलेला आरोपी अब्दुल्ला अब्दुल रशीद रेडियोवाला याला इंटरपोलच्या माहितीनंतर 2019 ला अमेरिकेने भारतात पाठवले होते. फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जाते. 2022 मध्ये भारताने 93 इंटरपोल नोटीस बजावल्या होत्या. 2015 पासून 80 फरार आरोपींना इंटरपोलच्या नोटीस पाठवल्यानंतर भारतात परत आणण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे इंटरपोलने नोटीस बजावलेल्या निरनिराळ्या देशांचे 218 फरार गुन्हेगार भारतात देखील आढळून आले आहेत. त्यांची देखील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून त्या त्या देशांना त्या गुन्हेगारांचा ताबा सोपवण्यात आला आहे.