मुंबई - देशभरात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, धारावीत लसीकरणाचा वेग संथ आहे. हा वेग वाढविण्यासाठी धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत धारावीतल्या आरोग्य केंद्रात नागरिकांना लस दिली जाणार आहे.
जे होऊ नये तेच घडले -
मुंबईत कोरोनाने एंट्री केल्याने अनेकांची चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर जे होऊ नये तेच घडले; म्हणजेच धारावी परिसरातही कोरोनानं एन्ट्री केली. तेव्हा मुंबईकर आणि प्रशासन यांच्यापुढे कोरोना रोखण्याचे खूप मोठे आव्हान होते. कारण, धारावी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे नागरिकांची खूप गर्दी असते. यानंतर धारावीतला कोरोना लवकरात लवकर आटोक्यात यावा यासाठी प्रशासनानं कंबर कसली आणि धारावीत कोरोनाला वेसण घातली.
हेही वाचा - होम क्वारंटाईन असताना अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली कशी? फडणवीसांचे शरद पवारांना ट्विट
यामुळे लसीकरण प्रक्रियेला येणार वेग -
सध्या तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात धारावीतून लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी धारावीत आजपासून (सोमवार) नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. धारावीतील अनेकांना लसीकरणासाठी कशाप्रकारे नोंदणी करायची? याची माहिती नाही. अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था आणि खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे.
हेही वाचा - व्यवसायांना मुभा देता.. मग वारकऱ्यांमुळेच कोरोना वाढतो का?
पाच कक्ष, रोज एक हजार जणांना लस -
धारावीच्या लसीकरण केंद्रात पाच कक्ष उभारण्यात आलेले आहेत. येथे एका वेळेस पाच जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय, दिवसाला एक हजार जणांना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.