मुंबई : भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. हे महाविद्यालय एमबीबीएससाठीचे असणार आहेत. त्यात महाराष्ट्रात चार तसेच गुजरात आसाम, हरियाणा, कर्नाटक व तामिळनाडू या प्रत्येक राज्यासाठी तीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहेत. आंध्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच वैद्यकीय महाविद्यालय असणार आहेत. महाराष्ट्रात याआधीच सरकारी आणि खासगी मिळून 55 महाविद्यालय असून आता त्यामध्ये 4 महाविद्यालयांची भर पडणार आहे. तसेच 10 हजार एकशे पंचेचाळीस विद्यार्थी एकूण 55 महाविद्यालयात शिकू शकतात. आता त्यामध्ये 400 विद्यार्थ्यांची वाढ होणार आहे.
राज्यातील एमबीबीएस महाविद्यालय आणि विद्यार्थी स्थिती : राज्यामध्ये एकूण एमबीबीएसचे महाविद्यालय 55 आहेत. त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांसाठी 10 हजार 145 इतक्या जागा आहेत. 55 महाविद्यालयांपैकी 24 शासकीय म्हणजे सरकारी खर्चावर चालणाऱ्या आहेत. तर 31 पूर्णतः खासगी पद्धतीने चालवण्यात येणारे महाविद्यालय आहेत. यामध्ये आता चार महाविद्यालयांची भर पडणार आहे. 400 विद्यार्थ्यांच्या जागा त्यामध्ये निर्माण होणार आहेत. हे सर्व एमबीबीएससाठीचे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहेत. नीट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय एमबीबीएसला प्रवेश मिळत नाही.
देशात 702 एमबीबीएस महाविद्यालय, महाराष्ट्रात 59 : भारतभरात यावर्षी एमबीबीएससाठी एकूण सर्व राज्य मिळून 702 महाविद्यालयांची संख्या झालेली आहे. त्यामध्ये सरकारी आणि खासगी असे दोन्ही प्रकारचे महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमध्ये 1 लाख 7 हजार 658 विद्यार्थ्यांच्या जागा आहेत. राज्यात आधीचे 55 आणि आता नवीन चार सरकारी महाविद्यालय मिळून आता 59 इतकी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या झाली आहे.
400 विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार : राज्यामध्ये नवीन सुरू होणाऱ्या एकूण चारही एमबीबीएससाठीच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी जागा असतील. म्हणजे एकूण 4 महाविद्यालयात मिळून 400 विद्यार्थ्यांचे सीट वाढणार आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोकणात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी देखील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याला मान्यता मिळाली की ते देखील सुरू होणार आहे. उस्मानाबाद येथे तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. परभणी रत्नागिरी देखील सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप परभणीला मान्यता मिळालेली नाही, मान्यता मिळाली की ते महाविद्यालय देखील सुरू होणार.
परभणीला परवानगी मिळण्याची प्रतीक्षा : यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण प्रशिक्षण संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी महाविद्यालयाला फक्त एक्झामिनेशन करणे बाकी आहे. परभणीला परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असे चार एमबीबीएस महाविद्यालय सुरू होत आहेत. प्रत्येक महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने चार महाविद्यालयात 400 विद्यार्थी जागा त्यामध्ये निर्माण होणार असल्याची माहिती संचालक दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
एमबीबीएसच्या जागांसाठी आरक्षण : महाराष्ट्रामध्ये 2023 साठी एमबीबीएससाठी अनुसूचित जातींसाठी सरकारी शिक्षण संस्थेत 13 टक्के तर खासगी शिक्षण संस्थेमध्ये सहा टक्के आरक्षण असणार आहे. आदिवासींसाठी सरकारी शिक्षण संस्थेत सात टक्के तर खासगी शिक्षण संस्थेमध्ये साडेतीन टक्के आरक्षण असेल. तर नोमेडीक ट्राईब यांच्यासाठी सरकारी महाविद्यालयात आठ टक्के तर खासगी महाविद्यालयांमध्ये चार टक्के जागा राखीव असतील. व्हीजेएनटीसाठी सरकारी महाविद्यालयातील 3 टक्के तर खासगीमध्ये दीड टक्का आणि ओबीसीसाठी सरकारी महाविद्यालयात 19.5 टक्के तर खासगी शिक्षण संस्थेत 9.5 टक्के आरक्षण असेल. दिव्यांगांसाठी सरकारी महाविद्यालयामध्ये पाच टक्के तर खासगी शिक्षण संस्थेमध्ये देखील पाच टक्के जागा आणि महिलांसाठी सरकारी शिक्षण संस्थेमध्ये 30 टक्के तर खासगी शिक्षण संस्थेमध्ये देखील 30 टक्के राखीव जागा अशा प्रकारच्या आरक्षणाचे प्रमाण असणार आहे.
हेही वाचा -
Literacy Skills : हरियाणा, हिमाचल गिरवत आहेत महाराष्ट्राचे धडे