मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केले.
हेही वाचा - अयोध्या वाद : जाणून घ्या, काय आहे पार्श्वभूमी आणि घटनाक्रम
चव्हाण म्हणाले, कोणाच्याही भावना न दुखावता हा निकाल दिला गेला आहे. मात्र, भाजप या निकालाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला मंदिर उभारण्यासंबंधी ट्रस्ट बनविण्याची आणि सुन्नी बोर्डाला जमीन देण्याची ठराविक वेळ दिली आहे. त्यानुसार त्यांनी योग्य वेळेत काम पूर्ण करावे.
चव्हाण यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय पेचावर बोलताना सांगितले की, राज्यात त्रिशंकू सरकार स्थापन होण्याची स्थिती आहे. राज्यपालांनी वेळ न घालवता सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे. तसेच भाजपला राज्यातील सरकारमधून बाहेर ठेवण्याची आमची ठाम भूमिका असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखवण्या प्रकरणी चव्हाण म्हणाले, आमच्या आमदारांना भाजपच्या नेत्यांनी नाही तर, दलालांनी आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्यातील काँग्रेसची भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. चव्हाण म्हणाले, आम्हाला भाजप घोडेबाजार करेल, अशी भीती आहे, त्यामुळे तशी खबरदारी घेत आमच्या आमदारांना राजस्थानमध्ये ठेवले आहे. तेसच दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक आहे. त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय घेणार आहोत.
हेही वाचा - अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस