मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम आता जोरदार वाजू लागले आहेत. राज्यातील शिंदे गटाचे संसदेतले नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट 22 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगून 22 जागांवर आपली दावेदारी सांगितली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने 26 जागा लढवाव्यात आणि शिवसेनेने त्यांच्या पूर्वीच्या सूत्रानुसार 22 जागा लढवाव्यात अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यावरून राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून शिंदे गटाचे दुसरे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भारतीय जनता पक्ष आपल्याला सापत्न वागणूक देत असून 22 जागांवर आपण उमेदवार उभे करणार असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाला सावरण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातून केला जात असला तरी शिंदे गटाने आपली 22 जागांची महत्त्वकांक्षा बोलून दाखवलीच आहे. शिवसेनेचे राज्यात 18 खासदार निवडून आले असताना त्यापैकी तेरा खासदार आता शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे नेमकी शिंदे गटाकडे किती संख्या आहे आणि काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घेऊया.
वडिलांच्या विरोधात लढायला तयार : शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नुकताच घेतला. या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत रणनीती आखण्यात येत आहे. शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आगामी महापालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी या मतदारसंघाची जबाबदारी गजानन कीर्तीकरांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांच्यावर ठाकरे गटाने सोपवली आहे.
पक्षाने आपल्याकडे जबाबदारी सोपवल्यास आणि विश्वास दाखवल्यास आपण आपले वडील गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहोत. पक्षाचा आदेश आपल्याला मान्य असेल आणि त्यानुसार आपण काम करू - अमोल कीर्तिकर
शिंदे गट विरुद्ध उद्धव गट : शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य ताकद असलेल्या मतदार संघातील हे खासदार आहेत. त्याच सोबत मुंबईतील दोन महत्त्वाच्या मतदारसंघातील खासदारही शिंदे गटासोबत गेले आहेत. एकूणच शिवसेनेची मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील ताकद अधिक आहे. हे खासदार सध्या शिंदे गटाकडे गेले असले तरी, शिवसैनिक आणि मतदार मात्र ठाकरेंसोबत कायम राहतील, असा एक अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळे या जागांसाठी ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीत दावा सांगितला आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटातील विद्यमान खासदारांनी ही युतीत दावा सांगितला आहे. त्यामुळे वास्तविक या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत न होता शिंदे गट विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी लढत होण्याची शक्यता ज्येष्ठ राजकीय, विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे गटाला चेहरा नाही : लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो किंवा भाजप सेनेचे सरकार असो यांच्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली. आपण काल परवाचा गजानन कीर्तिकर स्टेटमेंट ऐकले की, भाजपमध्ये आणि एनडीए सोबत सरकारमध्ये आहोत. आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली जाते. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यामध्येही सारं काही अलबेला आहे, असं म्हणता येणार नाही. एकंदरीत परिस्थिती बघता हा शिव सेनेचा फॉर्मुला जो दिसतो आजच्या घडीला आत्ताच्या सगळ्या समीकरणांना डोळ्यासमोर ठेवलं तर शिंदे गटाच्या 22 जागा आहेत. त्याच मिळतील फार फार तर जागांची अदलाबदल होऊ शकेल. कारण आता राजकीय समीकरण बदललेली आहेत. मात्र एक नक्की आहे की शिंदे गट हा याला मोठा चेहरा नाही. जो लोकसभा निवडणुकांना समोर जाऊ शकेल.
शिवसेनेला नरेंद्र मोदींचा आधार : एक मात्र खरे की नरेंद्र मोदींचाच आधार महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घ्यावा लागेल. दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा जो प्रभाव आहे तो एमएमआर रिजन म्हणजे मुंबई ठाणे पालघर कोकणातला काही भाग, नवी मुंबई त्याच्या पलीकडे फारसा दिसत नाही. दुसरीकडे कीर्तीकरांच्या स्टेटमेंट आहे. त्यालाही फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जर म्हणतो की, आम्ही एनडिएचा भाग असतो. आम्हाला डावले जाते आहे. विकास कामांमध्ये हे एकंदरीतच शिंदे यांच्यासाठी आव्हान असेल. त्यांची आतापर्यंतचे गेल्या वर्षी सव्वा वर्षातील परीक्षा असेल. लोकसभा निवडणुकांना कसे सामोर जातात, अर्थातच एकनाथ शिंदेंना लोकसभांच्या निवडणुकांमध्ये फार रस असेल असे दिसत नाही. पण जे काही तेरा चौदा खासदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत ते तरी किमान तेवढ्या तरी जागा टिकून राहतात का. या पलीकडे काही फार होईल असे चित्र दिसत नाही, अशी प्रतिक्रिया ही आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली.
शिंदे गटासाठी तेरा जागा नक्की : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती मागच्या लोकसभा निवडणुकीत होती. परंतु आता येणाऱ्या विशेष निवडणुकीमध्ये ही युती होणार आहे. ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अशी होणार आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचे गणित आहे ते बदलण्याची शक्याता आहे. तशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्ते यांची धारणा झालेली आहे. शिंदे गटाचे जे खासदार आहेत ते 13 खासदार त्यांच्यासोबत आलेले आहेत. तिकडे उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे त्यांनीही महाविकास आघाडीमध्ये आपल्याला 19 जागा हव्यात. 19 पेक्षा कमी जागा आम्ही लढणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे.
लोकसभा निवडणुकीची मोर्चा बांधणी सुरू : महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकींना केवळ एक वर्ष उरलेला असल्यामुळे पाचही महत्वाचे पक्ष आहेत त्या सर्वांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चा बांधणी सुरू केलेली आहे. त्यामुळे हा जागा वाटपाचा विषय आता पुढे आलेला आहे. आता जे दिसतंय त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला तेरा जे विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या जागा नक्की मिळणार आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रथम प्राधान्य हे कुठल्याही जागा वाटपाचं मुख्य सूत्र असतं. उरलेल्या ज्या शिंदे गटाच्या म्हणून किंवा मूळच्या शिवसेनेच्या म्हणून ज्या सात आठ जागा उरलेले आहेत तिथे काय करायचं हा मुख्य प्रश्न या युतीच्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यामुळे असणार आहे. भारतीय जनता पक्ष हा साधारणपणे 30 ते 32 जागांवरती निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -