मुंबई : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचीमधील तीनही पक्षांनी दोन जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या होणाऱ्या पोटनिवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आहे. पिंपरी चिंचवड या विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने जोर लावला आहे. पिंपरी चिंचवडची जागा आपल्याला मिळावी, यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते अजित पवार जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासोबत मातोश्रीवर बैठक पार पडली होती. त्यानंतर शिवसेना भवन येथे संजय राऊत उद्धव ठाकरेंची देखील बैठक घेतली.
2019 च्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार : 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते. मात्र याच जागेवर युती असताना देखील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राहुल कलाटे यांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं. ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत पिंपरी चिंचवड विधानसभेची जागा आपल्याला मिळावी. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. यावेळी ची परिस्थिती पाहता शिवसेनेचा उमेदवार या भागावर निश्चित निवडून येईल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कसबा पेठ विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस इच्छुक : कसबा पेठ विधानसभा निवडणूक गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आली आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला असला तरी, येथे काँग्रेसच्या उमेदवाराने कडवी झुंज दिली होती. काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार द्यायला हवा. यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आग्रह धरला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कसबा पेठ विधानसभा उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे.
राष्ट्रवादीकडून दोन्ही जागांवर दावा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन्ही विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देण्यात तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार या दोन्ही जागांवर उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत. म्हणूनच आधी पिंपरी चिंचवड मतदार संघात ठाकरे गटाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारी बाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार मातोश्रीवर पोहोचले होते. तर येत्या दोन फेब्रुवारी च्या होणाऱ्या बैठकीत काँग्रेस सोबत कसबा पेठ येथील मतदार संघाबाबत देखील अजित पवार काँग्रेस सोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Order To Insurance Company : जिल्हा ग्राहक निवारणचा विमा कंपनीला दणका; ग्राहकाला व्याजासह खर्च देण्याचा आदेश