मुंबई - कोरोना लसीकरण मोहीम मुंबईत वेगात सुरू असून पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 80 टक्के कोरोना योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तेव्हा आजपासून दुसऱ्या टप्प्याची ट्रायल सुरू झाली असून, परवापासून खऱ्या अर्थाने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात होईल. या टप्प्यात 1 लाख 80 हजार फ्रंटलाईन योद्ध्यांना लस दिली जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - शरजीलला पळून जाण्यास महाविकास आघाडी सरकारने केली मदत; आशिष शेलारांचा आरोप
दुसऱ्या टप्प्यासाठी लसीकरण केंद्राचा आकडा 9 वरून 15 वर नेण्यात आला आहे. त्यामुळे, आता परवापासून या 15 केंद्राच्या माध्यमातून दुसरा टप्पा पार पाडण्यात येईल, असेही काकाणी यांनी सांगितले.
मुंबईला आतापर्यंत मिळाले अडीच लाख डोस
16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानुसार मुंबईत 9 लसीकरण केंद्राद्वारे पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 1 लाख 30 हजार कोरोना योद्ध्यांची नोंदणी झाली होती. त्याप्रमाणे आतापर्यंत अंदाजे 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, केंद्राकडून मुंबईला लसीचे अडीच लाख डोस मिळाले आहेत. यातील 60 हजाराहून अधिक डोस वापरण्यात आले आहेत. उर्वरित डोस आता दुसऱ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणार असून, हे डोस सध्या पुरेसे असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
1 लाख 80 हजार फ्रंटलाईन योद्ध्यांची नोंदणी
पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना (डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी) तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन योद्ध्यांना अर्थात, सफाई कामगार, पोलीस आणि पालिका कर्मचारी यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी 1 लाख 80 हजार जणांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच सेव्हन हिल्स आणि नेस्को कोविड सेंटर या दोन केंद्राची भर पडली. तर, आता येत्या पाच-सहा दिवसात आणखी केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे मुंबईतील एकूण केंद्र 15 होतील, असे काकाणी यांनी सांगितले. तेव्हा दुसऱ्या टप्प्यात 15 केंद्राद्वारे लसीकरण होणार आहे.
आजपासून दुसऱ्या टप्प्याच्या ट्रायलला सुरवात
1 लाख 80 हजार फ्रंटलाईन योद्ध्यांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यात करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यामुळे, हे आव्हान योग्य प्रकारे पेलण्यासाठी पालिका तयार झाली आहे. आज पहिल्या 9 केंद्रात दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आली. तर, उद्याही याच केंद्रात ट्रायल होईल. आज खूप कमी संख्येने ट्रायल घेण्यात आली. पण, उद्या ट्रायलमध्ये मोठ्या संख्येने फ्रंटलाईन योद्ध्यांना लस देण्याचा मानस आहे. तर, परवापासून दुसऱ्या टप्प्याला सुरवात करत शक्य तितक्या लवकर 1 लाख 80 हजार फ्रंटलाईन योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - 'हे' सात जिल्हे वगळता, राज्यातील खासगी रुग्णालयांवरील निर्बंध हटवले