मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आज भाजपची कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. विशेष करून याबाबत त्यांना यापूर्वीच पूर्वकल्पना देण्यात आली, असून त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा या बैठकीत मांडला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेसोबत राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना त्याबाबत आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे. विशेष करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विशेष रणनीती या बैठकीत आखली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप : एकीकडे भाजपचा कोअर कमिटी बैठकीत भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जाणार असताना दुसरीकडे शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार, अन्न, औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, खणीकर्म व बंदर विकासमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी विरोधकांकडून मागणी केली जात असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीस सुद्धा चर्चा होणार आहे.
घर चलो अभियानावर भर : मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याने मोदी @९ या अभियानांतर्गत देशभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत केंद्रातील मोदी सरकारच्या जनकल्याण योजना पोहोचवण्यासाठी "घर चलो अभियान" यावर जास्तीत जास्त भर देण्यासंदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. घर चलो अभियानांतर्गत प्रत्येक नेत्यावर कमीत कमी ५०० घरी भेटी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ही जबाबदारी स्वतः देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आपल्या मतदार संघात पार पडत असून त्याप्रमाणे इतरांनाही ती जबाबदारी पार पाडावी, यासाठी ते स्वतः आग्रही असणार आहेत.