मुंबई - भायखळाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) असलेल्या दोन वृद्धपाकळीला आलेल्या हत्तीणींच्या शेपटीचे केस काढून विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळणी करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल घेऊन चौकशी करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
राणीच्या बागेत दोन हत्तीणी आहेत. या हत्तीणींच्या शेपटीचे केस काढून राणी बाग प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताबाबत राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याकडे विचारणा केली असता, यात काही तथ्य नाही. दोन्ही हत्तीणी या वृद्धपाकळीला आल्या आहेत. एक ५४ वर्षांची तर दुसरी ६४ वर्षांची आहे. विविध कारणांमुळे त्यांच्या शेपटाची केस जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
सध्या मुंबईच्या रस्त्यांवर हत्ती दिसत नाहीत, मात्र मुंबईतील अनेक ज्वेलर्स एलिफंट रिंग बनवून देतात. त्यासाठी मुंबईबाहेरून हत्तीच्या शेपटाचे केस मिळवले जातात. हत्तीच्या शेपटाचा केस काढण्याचा गुन्हा उघड झाला तर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ३ ते ७ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांपेक्षा अधिक दंड आकारला जाऊ शकतो. हा गुन्हा शहरात उघड झाला तर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू ऑनिमल आणि आयपीसीअंतर्गत अधिक शिक्षा होऊ शकते. असे मानव वन्यजीव रक्षक, मुंबई शहर व पॉज संस्थेचे सचिव सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले.