मुंबई Sudhanva Deshpande News : आयआयटी मुंबईच्या ह्युमॅनिटी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतातील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सुधन्वा देशपांडे यांना आयआयटीच्या कार्यक्रमात ऑनलाईन आमंत्रित केल्यामुळं वादंग झालाय. सुधन्वा देशपांडे आणि शर्मिष्ठा साहा यांनी पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेचं समर्थन केल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रारदेखील देण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता सुधन्वा देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण : 6 नोव्हेंबर 2023 रोजी आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी ऑनलाइन कार्यक्रमात प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते सुधन्वा देशपांडे यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी अतिथी वक्ते सुधन्वा देशपांडे यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, सुधन्वा देशपांडे यांनी आपली भूमिका मांडतांना पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांच्या कृतीचं समर्थन केलं, असा आरोप विवेक विचारमंच या विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला. तसंच याप्रकरणी मुंबई आयआयटीच्या बाहेर आंदोलनही करण्यात आलं.
सुधन्वा देशपांडे यांची प्रतिक्रिया : या प्रकरणी प्रतिक्रिया देत सुधन्वा देशपांडे म्हणाले की, प्राध्यापिका शर्मिष्ठा साहा यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमात त्यांनी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या संबंधातील 2004 ची डॉक्युमेंट्री 'अर्नाज चिल्ड्रन' दाखवली. या निमित्तानं मी पॅलेस्टाईनमध्ये गेलो होतो, तेव्हाची आठवण सांगितली. जेव्हा 2015 मध्ये मी पॅलेस्टाईनला गेलो त्यावेळेला जकार्या झुबेदी या नेत्याला भेटलो. जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सशस्त्र संघर्ष सोडलेला होता. मात्र एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर खोडसाळ आणि संदर्भहीन निराधार बातमी दाखवल्यामुळं काही लोकं माझ्यावर आरोप करत आहेत, असं ते म्हणाले.
- राज्यातील लेखक साहित्यिकांचा देशपांडेंना पाठिंबा : लेखक साहित्यिका उर्मिला पवार, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी लेखक शिवा इंगोले लेखक आणि सांस्कृतिक कर्मी सुबोध मोरे यांनी विवेक विचार मंचाच्या या खोडसाळ भूमिकेचा निषेध केलाय. तसंच सुधन्वा देशपांडे यांची भूमिका अत्यंत उचित असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
हेही वाचा -