मुंबई - सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली असून, त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. एक युनियनचा पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. यांच्या आत्महत्येनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेने देखील या घटनेची दखल घेतली आहे. याबाबत संताप व्यक्त करत यापुढे कोणत्याही युनियनचा पदाधिकारी जर त्रास देत असल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मी धमकी देतोय
याच्या पुढे कोणत्याही निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकाराला जर सेटवर जाऊन त्रास दिल्यास, हातपाय तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही असे ट्विट खोपकरांनी यांनी केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये राजू यांनी लेबर युनियनचे राकेश मौर्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते मला खूप त्रास देत आहेत. माझे कुठच्याही प्रकारचे पैसे थकीत नाही. माझे पैसाही वेळेवर देण्यात आले आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत असे सांगण्यास भाग पाडत आहे.
हे म्हणाले अमेय खोपकर
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अमेय खोपकर यांनी केले आहे.
हेही वाचा - ‘कसौटी जिंदगी की' फेम प्राचीन चौहानला अटक, तरुणीने केला विनयभंगाचा आरोप