मुंबई - गेल्या तीन महिन्यात मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रसार कमी होत असतानाच पालिकेकडून रुग्ण आणि मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी हे आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया देत, अशी कोणत्याही प्रकारची लपवाछपवी केली जात नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिका आयसीएमआर आणि केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे पारदर्शक पद्धतीने आकडेवारी जाहीर करत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
आकडेवारी लपवत असल्याचा आरोप -
मुंबईमध्ये गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. वर्षभरात मुंबईत ६ लाख ७८ हजार २६९ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ६ लाख १६ हजार ९९८ रुग्ण बरे झाले असून १३ हजार ८९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण शोधण्यासाठी गेल्या वर्षभरात ५७ लाख १० हजार ३७० चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात कोरोनाने मुंबईत पुन्हा डोके वर काढले आहे. मागील महिन्यात कोरोनाचे ७ ते ११ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये गेल्या काही दिवसात घाट दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात ३ हजार ते १७०० रुग्ण आढळून येत आहेत. ही आकडेवारी खोटी असल्याचा आणि आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
रुग्ण आणि चाचण्या -
मुंबईमध्ये १ मे ३,९०८ रुग्ण आढळून आले आहेत त्यादिवशी ३७ हजार ६०७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. २ मे ला ३,६७२ रुग्ण आढळून आले असून त्यादिवशी २८ हजार ६३६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ३ मे ला २,६६२ रुग्ण आढळून आले असून २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ४ मे रोजी २,५५४ रुग्ण आढळून आले त्यादिवशी २९ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ५ मे रोजी ३,८७९ रुग्ण आढळून आले असून त्यादिवशी ३५ हजार ३७७ चाचण्या करण्यात आल्या, ६ मे रोजी ३,०५६ रुग्ण आढळून आले असून ३० हजार ९४२ चाचण्या करण्यात आल्या, ७ मे रोजी ३,०३९ रुग्ण आढळून आले असून ३५ हजार २२४ चाचण्या करण्यात आल्या. ८ मे रोजी २,६७८ रुग्ण आढळून आले असून ३३ हजार ३७८ चाचण्या करण्यात आल्या, ९ मे रोजी २,४०३ रुग्ण आढळून आले असून ३२ हजार ५९० चाचण्या करण्यात आल्या तसेच १० मे रोजी १,७९४ रुग्ण आढळून आले असून २३ हजार ०६१ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई मॉडेलचे कौतुक -
जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड चाचण्या व कोविड मृत्युंच्या नोंदी करीत आहे. कोविड व्यवस्थापनामध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले अविरत प्रयत्न, त्याचे प्रत्यक्ष दिसत असलेले सकारात्मक परिणाम मुंबईसंबंधी आकडेवारीमध्ये उमटत आहेत. कोविड संसर्गाची स्थिती टप्प्या-टप्प्याने नियंत्रणात आणून ‘मिशन झिरो’ साध्य करण्याचे लक्ष्य प्रशासनाने समोर ठेवले आहे. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींसह मुंबईकरांचे देखील सहकार्य लाभत असून त्याचा एकत्रित परिणाम म्हणून संसर्ग नियंत्रणात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई मॉडेलचे कौतुक करीत त्याचे अनुसरण करण्याचे निर्देश एका सुनावणीप्रसंगी नुकतेच दिले होते. त्यापूर्वी जागतिक बँकेसह जागतिक आरोग्य संघटनेने देखील मुंबईतील कोविड व्यवस्थापनाचे जगजाहीर कौतुक केले आहे.
आरोप निराधार -
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर संकेतस्थळावर देखील त्याची नोंद असते. सरकारकडेही नियमितपणे त्याची माहिती सादर करण्यात येते. त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो. कोविड मृत्युंच्या नोंदी कमी दाखवणे ही स्वतःचीच फसगत करण्यासारखे आहे, त्यातून प्रत्यक्ष डोळ्यांदेखत दिसणारी स्थिती बदलता येत नाही, याचे भान प्रशासनाला आहे. तसेच अकारण मृत्युचे आकडे वाढवून जनतेच्या मनात अनाठायी भीती निर्माण करणे, हे देखील सर्वस्वी चुकीचे आहे. यामुळे निकषांप्रमाणेच योग्य ती नोंद मृत्यू प्रकरणांमध्ये केली जाते, याबद्दल नागरिकांनी खात्री बाळगावी. त्यामुळे 'कोविड व्यतिरिक्त' कारणांची नोंद वाढवून प्रत्यक्ष कोविड मृत्युंची नोंद कमी करण्यात येत असल्याचा आक्षेप पूर्णपणे निराधार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
कोविड संसर्ग मृत्यू दर कमी -
मुंबईतील कोविड संसर्गाचा दर हा लपविण्याचा किंवा कमी दाखवण्याचा कोणताही प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने केलेला नाही. दैनंदिन चाचण्या, बाधितांची संख्या, मृत्युंची संख्या हे सर्व कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सरकारकडे नियमितपणे सर्व माहिती दिली जाते. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये कोविड संसर्ग मृत्यू दर हा सरासरी ०.७१ टक्के इतका आहे. या कालावधीतील कोविड व्यतिरिक्त झालेले इतर मृत्यू जरी यात जमेस धरले तरी हा दर ०.९८ टक्के इतका म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्यस्थितीत जागतिक कोविड मृत्यू दर हा २.११ टक्के इतका तर भारताचा मृत्यू दर हा १.१२ टक्के इतका आहे. म्हणजेच या दोन्ही तुलनांमध्ये मुंबईतील कोविड संसर्ग मृत्यू दर हा कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
चाचण्यांचा वेग कायम -
चाचण्यांची संख्या वर्षभरापासून सातत्याने वाढते आहे. २०२१ या वर्षाचा विचार केला तर जानेवारीमध्ये ४ लाख ४४ हजार ७८३, फेब्रुवारीमध्ये ४ लाख ७६ हजार २५४, मार्च ८ लाख ३८ हजार २१०, एप्रिलमध्ये १३ लाख ३१ हजार ६९७ इतक्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मे २०२० ते ७ मे २०२१ या वर्षभराच्या कालावधीमध्ये मुंबईत एकूण ५९ लाख १८ हजार ८१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या जितकी अधिक तितके अधिकाधिक बाधितांना शोधणे अधिक सोपे, हे सूत्र लक्षात ठेवून चाचण्यांचा वेग कायम ठेवण्यात आला आहे असे पालिकेने कळविले आहे.
सरकारने ठरवल्यानुसार चाचण्या -
आरटीपीआर आणि अँटीजेन या चाचण्यांची विश्वासार्हता सरकारनेच प्रमाणित केलेली आहे. यापैकी कोणती चाचणी कधी करायची, हे निकषही आयसीएमआर व सरकारने ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच या चाचण्या केल्या जातात. एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी पाहता, डिसेंबर २०२० मध्ये ५०.३६ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ६५.३१ टक्के, फेब्रुवारी २०२१ मध्ये ७४.२३ टक्के, मार्च २०२१ मध्ये ६७.२४ टक्के, एप्रिल २०२१ मध्ये ६७.८७ टक्के इतके आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आढळलेल्या बाधितांची टक्केवारी पाहता डिसेंबर २०२० मध्ये ७.१२ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ५.३९ टक्के, फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.३३ टक्के, मार्च २०२१ मध्ये १५.४८ टक्के, एप्रिल २०२१ मध्ये २३.४३ टक्के इतके बाधित आढळले. दुसऱ्या लाटेची देशभरातील तीव्रता पाहता, आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण मुंबईत सातत्याने वाढवूनही बाधितांची संख्या अथवा संसर्गाचे प्रमाण त्या तुलनेने मुंबईत कमीच आहे असे पालिकेने म्हटले आहे.