मुंबई - ऑक्सफर्डच्या 'कोविशिल्ड' कोरोना लसीच्या मुंबईतील मानवी चाचणीला कधी सुरुवात होणार व प्रत्यक्षात लस कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाचणी आज सुरू होणार, उद्या सुरू होणार असे सांगितले जात आहे. आता मात्र, ही प्रतिक्षा संपली असून चाचणीसाठी लागणारी भारतीय आयुर्विज्ञान व संशोधन परिषदे(आयसीएमआर)ची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात नायर रुग्णालयात कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती नायरमधील वरिष्ठ डॉ. रेणुका मुन्शी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली. चाचणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला 180 दिवसांचा अर्थात सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कोरोनाची लस प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध होण्यासाठी २०२१च्या मार्च-एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
जगभरात कोरोनाचा कहर वाढत असून यावर योग्य लस हाच एकमेव उपाय आहे. अशावेळी 'कोविशिल्ड' लसीच्या माध्यमातून भारतीयांसाठी एक आशेचा किरण उजाडला आहे. या लसीची आता तीन देशात मानवी चाचणी करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार मुंबईत नायर आणि केईएम रुग्णालयात ही चाचणी होणार आहे. यासाठी महिन्याभरापासून तयारी सुरू आहे. 1 सप्टेंबरपासूनच चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि आयसीएमआरच्या परवानगी यामुळे ही चाचणी रखडली आहे. आता आयसीएमआरकडून परवानगी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या चार ते पाच दिवसात परवानगी मिळेल.
100 स्वयंसेवकांना टोचवली जाणार लस -
नायर आणि केईएममध्ये नेमक्या किती स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार याबाबत नेहमीच वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. मात्र, नायरमध्ये 100 स्वयंसेवक चाचणीत सहभागी करून घेतले जाणार असल्याचे डॉ. मुन्शी यांनी स्पष्ट केले आहे. या स्वयंसेवकांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 200 जणांनी नावे दिली आहेत. यातून पात्र 100 नावे अंतिम करत त्यांना लस दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
180 दिवस देखरेखीखाली -
इच्छुक स्वयंसेवकाची सर्वात आधी कोरोना चाचणी-अँटीबॉडीज चाचणी तसेच त्यांना इतर कोणताही आजार नाही ना याची तपासणी केली जाणार आहे. यात पात्र ठरलेल्या 100 जणांना लस टोचवण्यात येणार असून त्यानंतर तब्बल 180 दिवस म्हणजेच 6 महिने त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. पण हे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये नाही तर आपल्या घरीच असणार आहेत. फक्त डॉक्टर त्यांच्या संपर्कात राहणार आहेत. वेळापत्रकानुसार लस दिल्यानंतर 29व्या दिवशी आणि 59 व्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतर थेट 180 दिवसांनी शेवटची तपासणी होणार आहे. यादरम्यान विविध माध्यमातून डॉक्टरांचे विशेष लक्ष या स्वयंसेवकांवर असणार आहे. ही प्रक्रिया पाहता लस उपलब्ध होण्यासाठी 2021 उजाडणार हे मात्र नक्की.