मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस येथे दौऱ्यासाठी जाणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसचा दौरा रद्द केला आहे. यावर राष्ट्रवादीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्याला जाणार आहेत. आता या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय येणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला काय फायदा - राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्यात येणारे मोठे उद्योग गुजरात राज्याकडे गेले. यामधून महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगारही गेला. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी मुंबईतून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेले. त्यामुळे यावर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मुख्यमंत्री राज्यासाठी किती गुंतवणूक आणणार? राज्यातील किती तरुणांना रोजगार मिळणार? याचा खुलासा दौऱ्याला जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडून करण्यात आली आहे.
फेरफटका मारण्यासाठी दोवोसचा दौरा - मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री दावोसला फेरफटका मारायला चालले आहेत. मुंबईत येऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुंतवणूक घेऊन जात आहेत. त्याआधी महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरातला पाठवण्यात आले. हे सर्व पाहता राज्यातल्या जनतेला राज्यसरकार कडून फारशा काही अपेक्षा नाहीत असा, टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्यात उद्योग धंद्याची वाढ व्हावी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सुरू व्हावी, यासाठी राज्य सरकार कोणतेही महत्त्वाचा पाऊल उचलत नाही असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.
राज्यात किती गुंतवणुक येणार - महाराष्ट्र सहित गुंतवणूक आपल्या इथे आणण्यासाठी केंद्र सरकारची टीम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्याच्या टीम देखील दोवोस येथे सामील होणार आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात किती प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. या चार दिवसीय दौऱ्यातून मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक आणावी यासाठी सरकार प्रयत्नांत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मनसुख मांडवीय अनुराग ठाकूर, पियुष गोयल हे देखील दावोसमध्ये दाखल होणार आहेत तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील आपल्या टीम सहित दावोसला पोहोचणार आहेत.