मुंबई - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घ लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सलून सुरू झाल्यानंतर आज हॉटेल व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन आता हॉटेल आणि लॉजिंग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 8 जुलैपासून 33 टक्के क्षमतेसह हॉटेल आणि लॉज सुरू केले जाणार आहेत. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरू करता येणार नाही, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशनसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत हॉटेल आणि लॉज सुरू करण्यावर हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. राज्य सरकारच्या या सुधारित आदेशामुळे लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची 8 जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे.
या संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाइन सुविधेसाठीच वापरल्या जातील. त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.
सर्व संस्थांनी 'या' गोष्टींची व्यवस्था करावी -
1) कोव्हिडपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत.
2) हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत.
3) प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक
4) पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत.
5) फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत.
6) चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी क्युआर कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी.
7) सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी.
8) एसी- सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता 40 ते 70 टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम
हॉटेल आणि लॉजवर येणाऱ्या पाहुण्यांसाठी सूचना -
1. कोव्हिडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश
2. फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक
3. प्रवाशांचे तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक
4. आरोग्य सेतू अॅप वापरण्याची ग्राहकांना सक्ती
5. हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा.
हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी एक कार्यपद्धती निश्चित केली आहे. लवकर ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार असून पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एका कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात. हॉटेल्स सुरू करायला काही अडचण नाही. मात्र, राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल. स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत.