मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर 24 तास उभे राहून कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस खात्यात कोरोना संक्रमित पोलिसांची संख्या दरदिवशी वाढत आहे. आज पोलिसांचे मनोबल वाढवणारी घटना घडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी सकाळी पुण्यावरून मुंबईला येताना एक्प्रेस-वेवर थांबून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. यामुळे या संकटाच्या काळात पोलिसांचा आनंद द्विगुणीत झाला.
पुण्याहून मुंबईला जात असताना एक्प्रेस-वेवर किवळे फाटा येथे बंदोबस्त करणारे पोलीस दिसल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख तिथे थांबले. त्यांनी यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, कामादरम्यान येणाऱ्या अडीअडचणी यांची माहिती घेऊन त्याबद्दल सूचना दिल्या.
या चर्चेदरम्यान अनिल देशमुख यांना बंदोबस्तासाठी असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचे समजले. वाढदिवस असूनही कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य करणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख असतो, या नात्याने अनिल देशमुख हे पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सहभागी झाले. श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला गेला.अनिल देशमुख यांनी जाधव यांना केक भरवून त्यांचा आनंद द्विगुणित केला.