मुंबई - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह प्रकरणावर आज सावध पवित्रा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर, त्यांनी याविषयी आपण या निकालाची प्रत आल्यानंतर सविस्तर अभ्यास करू आणि त्यानंतरच भूमिका मांडू, अशी माहिती मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे गेल्याने राज्यात यामुळे राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. सरकारला घेरण्याची नामी संधी हातात आल्याने त्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे असल्याने याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती भूमिका जाहीर केली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?'
सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारने आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासावर विश्वास ठेवत तेच तपास पूर्ण करतील, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची कोणतीही गरज नाही, असे वेळोवेळी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याविषयी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास असल्याचे विधान केले होते. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा आदेश दिल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यानेही सरकारच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर 'सत्यमेव जयते' असे लिहून एक ट्विट केले आहे.
हेही वाचा - 'सत्यमेव जयते'...सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा 'पवार विरुद्ध पवार'?