मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे योगदान राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेला माहीत आहे. परंतू, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ विरोधकांची कोंडी करण्यासाठी हा प्रकार चालवला जात असून तो अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार हेमंत टकले यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा होत असून अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर आमदार हेमंत टकले यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्य शिखर बँकेच्या व्यवहारासंदर्भात विधानमंडळात अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. त्या संदर्भातील चौकशी पूर्ण झालेली आहे. परंतु, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने हे प्रकरण चालवले जात आहे. त्यातून सरकारला केवळ विरोधकांची कोंडी करायचे आहे. याचाच भाग म्हणून गुन्हे दाखल करून विरोधकांना अडविण्याचा हा प्रकार आहे.
हेही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार
परंतु, राज्यातील जनता आता सत्ताधारी पक्षांचे सर्व मनसुबे ओळखून आहे. पवार यांचे योगदान काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्यातील प्रत्येक जनतेला त्यांच्या योगदानाची माहिती आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल. परंतू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकार सुरू आहे तो अत्यंत दुर्दैवी असल्याचे हेमंत टकले म्हणाले.