मुंबई - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
राज्य सरकारने जी कर्जमाफी योजना लागू केली, त्याचा लाभ सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांना मिळणार आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर 2019 नंतर कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यात 2 दिवसांपूर्वी कर्जमाफी योजनेच्या आधार प्रमाणीकरण सुरू झाले आहे. 3 महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.