मुंबई - शहरात रात्रीपासून पाऊस पडत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने यावेळी पाऊस पडत राहिल्यास पुन्हा मुंबईची तुंबई होऊ शकते. मुंबईमध्ये १३ व १४ जूनला अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने महापालिका हाय अलर्टवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुपारी समुद्राला भरती
मुंबईत बुधवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईची तुंबई झाली होती. सध्या मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रात्रीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. आज दुपारी 1.32 वाजता समुद्राला 4.32 मीटरची भरती आहे. यावेळेत फ्लडींग गेट बंद केले जातात यामुळे शहरातील पाणी शहरात थांबून राहिल्याने मुंबईची तुंबई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतक्या पावसाची नोंद
मुंबईत रात्रीपासून सतत पाऊस पडत असल्याने गेल्या 24 तासात शहर विभागात 79.66, पश्चिम उपनगरात 92.38 तर पूर्व उपनगरात 89.30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे पाणी हिंदमाता, सायन, किंगसर्कल, अंधेरी सबवे आदी भागात साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी साचल्याने दहिसर आनंद नगर व अंधेरी वीरा देसाई रोड (सोराटा पाडा) येथील वाहतूक वळवण्यात आली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
पालिका हायअलर्टवर
हवामान विभागाने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान पालिका यंत्रणा हाय अलर्टवर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.