मुंबई - हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबईत पावसाने शुक्रवारी सकाळी हजेरी लावली. विशेष करून मुंबई उपनगरच्या तुलनेत शहर विभागात पावसाचा जोर जास्त होता. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुलाबा येथे 160.6 तर सांताक्रूझ येथे 102.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचले होते. यामुळे काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान, पुढील 48 तासांसाठी हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. या 48 तासात शहर आणि उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गुरुवारी रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुलाबा येथे 160.6 तर सांताक्रूझ येथे 102.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पालिकेच्या पाऊस मोजणाऱ्या केंद्रावर शहर विभागात 95.04, पूर्व उपनगरात 68.47, पश्चिम उपनगरात 74.39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मुंबईत शहर विभागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने भुलाभाई देसाई मार्ग, बिंदू माधव जंक्शन, वरळी नाका, हिंदमाता जंक्शन, धोबीघाट कफ परेड चिराबाजार, पोलीस आयुक्त कार्यालय, भायखळा पोलीस स्टेशन, सायन रोड नंबर 24, गांधी मार्केट, अंधेरी, मालाड आदी ठिकाणी पाणी साचले. यामुळे या विभागातील वाहतूक काही वेळासाठी इतर मार्गावरून वळवण्यात आली होती. त्याच प्रमाणे बेस्ट बसेसची वाहतूकही वळवण्यात आली होती. मुंबईत चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्याने, कोरोनाची भीती बाजूला सारत लहान मुलांनी या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.
शुक्रवार दिवसभर झाललेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे घर तसेच घराचा भाग पडण्याच्या, शहर विभागात 2 तर पश्चिम उपनगरात 1 अशा एकूण 3 तक्रारी आल्या आहेत. शहर विभागात 10, पूर्व उपनगरात 5, पश्चिम उपनगरात 9 अशा एकूण 24 झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी नोंद झाल्या. तर शॉकसर्किटच्या 9 तक्रारी नोंद झाल्या. वरळी हिल रोड जरीमरी मंदिराजवळ दरड कोसळण्याची तक्रार प्राप्त झाली. याठिकाणी मातीचा काही भाग कोसळला मात्र त्यात कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
हेही वाचा - "राज्यातील आदिवासींचे प्रलंबित वनपट्ट्यांचे अधिकार पुढील 3 महिन्यात निकाली काढा"
हेही वाचा - नालेसफाईच्या कामांमधील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मागणी