मुंबई- हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत पावसाने जोर धरला आहे. विशेष करुन मुंबई उपनगराच्या तुलनेत शहर विभागात पावसाचा जोर जास्त असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे काही मार्गावरची बेस्ट बसेसची व इतर वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. पाण्याचा निचरा झाल्यावर बस आणि अन्य वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने कालच दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. आज (शुक्रवारी) सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहरात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भुलाभाई देसाई मार्ग, बिंदू माधव जंक्शन, वरळी नाका, हिंदमाता जंक्शन, धोबीघाट कफ परेड चिराबाजार, पोलीस आयुक्त कार्यालय, भायखळा पोलीस स्टेशन, सायन रोड नंबर 24, गांधी मार्केट, अंधेरी, मालाड आदी ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्याने या विभागातील वाहतूक काही वेळासाठी इतर मार्गावरुन वळवण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बेस्ट बसेसची वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबईत चक्रीवादळानंतर पहिल्यांदाच जोरदार पाऊस पडल्याने कोरोनाची भीती बाजूला टाकत लहान मुलांनी पावसाची मज्जा लुटली.
मुंबईत काल कुलाबा येथे 57.7 मिलिमीटर तर सांताक्रुझ येथे 11.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 8 ते 9 या एका तासात कुलाबा पंपिंग स्टेशन येथे 24, कुलाबा फायर स्टेशन येथे 24, नरिमन पॉईंट येथे 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 9 ते 10 या एका तासात कुलाबा पंपिंग स्टेशन येथे 72, कुलाबा फायर स्टेशन येथे 69, नरिमन पॉईंट येथे 59, मलबार हिल येथे 51, सी वॉर्ड येथे 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 10 ते 11 या एका तासात पश्चिम उपनगरात अंधेरी के वेस्ट कार्यालय येथे 39, सांताक्रूझ वर्कशॉप येथे 38, विलेपार्ले फायर स्टेशन येथे 37 तर अंधेरी पूर्व येथे 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हिंदमाता परिसरात पाणीच पाणी
पालिका दावा करते आम्ही नालेसफाई केली आहे. परंतु, जी परिस्थिती पाणी साचल्याची दरवर्षी असते तीच परिस्थिती यंदाही दिसत आहे. आजच्या मुसळधार पावसाने दादर हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे.