मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विस्तारित वसतिगृह इमारतीचे लोकार्पण तसेच पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि वैद्यकीय अधिकारी सेवा निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) , आमदार तामिळ सेलव्हन, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, डीन मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
भीतीवर मात करून उपचार
कोविडचा कार्यकाळ भयानक होता. तेव्हा सर्वांच्या मनात भीती होती. त्यावर मात करून लक्ष विचलित न होऊ देता आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार केले. यासाठी तुमचे आभार मानायला येथे आलो आहे. आपण सर्व मुंबईकर आहोत म्हणून काम करत आहोत. कोणताही भेदभाव ना करता काम करत आहोत. पालिकेच्या रुग्णालयात 13 हजार 756 खाटा आहेत त्या वाढवल्या जाणार आहेत, रोज मुंबईसह देशभरातून आलेल्या 80 ते 90 हजार रुग्णांवर उपचार केले कात आहेत. त्या रुग्णांना सुविधा दिल्या जात आहेत हे मुंबईचे कौतुक आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा देण्यासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
उपचार करूनच घरी पाठवले जाते
कोरोना काळात कोणी कोणाला जवळ करत नव्हते त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची काळजी घेतली. पालिका आणि सरकारी आरोग्य विभागाने चांगले काम केल्याने कोरोना काळात पालिका तसेच सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी सगळेच अगदी श्रीमंत लोकही मागणी करत होते. देशभरातून कोणीही पालिका रुग्णालयात आल्यास खाट मिळाली नाही तरी त्याच्यावर जमिनीवरही उपचार केले जातात, त्याला परत न पाठवता त्याच्यावर उपचार करूनच घरी पाठवले जाते असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगीतले. ज्या ठिकाणी रुग्णालयाची आवश्यकता आहे त्याठिकाणी रुग्णालय उभारण्याची मानसिकता महाविकास आघाडी सरकारची असल्याचे शेख यांनी सांगितले.