मुंबई - सध्या राज्यभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्र सरकारच्या पाया देखील पडावे लागले तर, राज्य सरकार तयार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला किती रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतील, याबद्दलची आकडेवारी पत्रकातून जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दिवसाला केवळ 26 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतील, असे या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळे दिवसाला 1 हजार इंजेक्शन कमी पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
ऑक्सिजन उपलब्धतेच्या कोट्याचे वाटप केंद्र सरकारकडे आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता अधिक ऑक्सिजन द्यावा. ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला सुरक्षित ट्रान्सपोर्टमध्ये तो उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती टोपे यांनी केंद्राला केली आहे. ऑक्सिजनबाबत आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर अवलंबून राहावे लागेल, असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.
दर दिवशी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचे केवळ 26 हजार कोटी मिळणार, अशा प्रकारचे पत्र केंद्र सरकारने काढले आहे. केवळ 26 हजार इंजेक्शन महाराष्ट्राला मिळत असतील तर, महाराष्ट्रात समोरील आव्हाने अजून वाढतील, अशी भीती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.