मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीला समजावा, यासाठी निलेश सकट या तरुणाने त्याची खासगी नोकरी सोडली आणि शिवकालीन शस्त्राचे संग्रह प्रदर्शन देशभर आयोजित करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्याने वाटचाल सुरू केली आहे.
निलेश हा कोपरखैरणे येथे राहतो. लहानपणापासून त्याला शस्त्र संग्रहाची आवड आहे. या आवडीमधूनच दुर्मिळ शस्त्राचा संग्रह करून इतिहास जगासमोर मांडू शकतो असे त्याला सुचले आणि त्यावर काम सुरू केले. १२ वर्षांपासून निलेश शिवकालीन इतिहास हा शिवप्रेमींसाठी मांडत आहे.
शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि त्याकाळातील नाणी शोधण्यासाठी तो पूर्ण राजस्थान, केरळ, मध्यप्रदेशसह पूर्ण भारतभर फिरला आहे. सुरुवातीला निलेश नोकरी सांभाळून हे प्रदर्शन भरवायचा. परंतु त्याला यासाठी जास्त वेळ मिळत नव्हता. दुर्मिळ शस्त्र जमा करण्यासाठी त्याला कुठेही जाता येते नव्हते. म्हणून त्याने ठरवले की नोकरी सोडून द्यायची आणि पूर्णवेळ शिवकालीन वस्तूच्या प्रदर्शनासाठी द्यायचा. आता निलेशकडे तलवारी, भाले, फरशी, विटा, जगदापुरी, मुघल तलवार, वाघ नखे, कट्यार अशा विविध प्रकारातील १००० पेक्षा जास्त शस्त्रे आहेत.
१२ वर्षांपासून मी शस्त्रास्त्रांचा अभ्यास आणि संग्रह करत आहे. मिळालेली माहिती ही फक्त माझ्यापुरती न राहता या शस्त्राचा मागचे शास्त्र लोकांना कळावे यासाठी प्रदर्शन घेत आहे. आतापर्यत गुजरात, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र येथे या शस्त्र संग्रहाची प्रदर्शने लावली आहेत. फक्त महाराष्ट्रात ३५० प्रदर्शन केली आहे. या शस्त्राकडे पाहताना यामागे एक मोठा इतिहास आहे. लोकांचे अज्ञान दूर व्हावे, हा हेतू आहे, असे निलेश म्हणाला. ही शस्त्रे आपल्या पूर्वजांनी जिंकलेल्या युद्धाचे साक्षीदार आहेत. हा इतिहास मला जगासमोर आणायचा होता.
महाराजांच्या सैन्यातील सैनिकांनी पराक्रम गाजवलेली शस्त्रे, मुगलाची ही शस्त्रे माझ्या संग्रहात आहेत. सर्वसामान्य हे पोटासाठी नोकरी करतात, मी ही केली. मला शस्त्राचा अभ्यास आणि भारतभर फिरण्यासाठी वेळ मिळत नव्हता म्हणून नोकरी सोडली आणि आता पूर्णवेळ हा अभ्यास करतो आहे. शस्त्र शोधताना अनेक अडचणी आल्या. काही विशेष किमती देऊन ही शस्त्रे विकत घ्यावी लागत. तरुणांना मी एवढाच संदेश देईन की सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. चुकीची माहिती पसरवू नका, असे निलेश यांनी सांगितले.