मुंबई - मराठा आरक्षणाच्या अंतर्गत एसईबीसी लागू करून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, यासंदर्भातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली. त्यामुळे यंदाच्या सत्रात मराठा आरक्षणाअंतर्गत वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांनी आज मराठा आरक्षणाच्या अंतर्गत एसईबीसी लागू करून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. वैद्यकीय प्रवेश यापूर्वीच सुरू झाले असले तरी आता प्रवेश देताना आरक्षण लागू करता येते, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत खुल्या प्रवार्गातील विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसीच्या अंतर्गत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.