नवी मुंबई - महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड डॉन विक्रांत देशमुख ( Maharashtra Most Wanted Don Vikrant Deshmukh ) उर्फ विकीला गोव्यातील पणजीतून जेरबंद केल्यानंतर आता त्याच्या नवी मुंबईतील उरण परिसरातल्या घरावर तोडक कारवाई ( Action on the home of the most wanted Don Vicky ) करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीने सिडको प्रशासनाने ही कारवाई केली आहे. विकीने केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षांपासून विकी मुंबई पोलिसांना चकवा देत होता.
विकीवर तब्बल 33 गुन्ह्यांची नोंद - 31 जुलै 2022 रोजी विकीला पणजी पोलिसांनी रात्री उशिरा पाठलाग करून पकडले होते. त्याच्याकडून पिस्तुल आणि 5 जिवंत राऊंड्स सापडले. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईझ्ड क्राईम (मोक्का) खाली त्याच्यावर महाराष्ट्रात गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. विकी देशमुखवर मंचर येथे बलात्कारासह पोक्सोचा देखील गुन्हा दाखल आहे. नेरूळमधील आपल्याच टोळीतील सचिन गर्जेच्या हत्या प्रकरणात विकी फरार होता. विकीच्या साथीदारांनी आपल्या दहशतीच्या जोरावर उरणमधील अशोक घरत यांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांची देखील हत्या केल्याचे तसेच इतर व्यावसायिकांकडून देखील या टोळीने मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे उघडकीस आले होते.
बलात्कार, पोक्सो यासारखे देखील गुन्हे - तसेच आरोपींनी बलात्कार, पोक्सो यासारखे देखील गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करून विकी देशमुखच्या टोळीतील इतर १४ आरोपींना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४ पिस्तूल व पावणेपाच लाखांची रोख जप्त केली. या टोळीने पनवेल, उरण व उलवे परिसरात संघटितपणे अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आल्याने विकी व त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.