मुंबई - गोपाळ काला पुरातन काळापासून चालत आलेल्या उत्सवपैकी एक उत्सव आहे. संघटन कौशल्याचे हे एक उत्तम प्रकटीकरण असून मस्ती, उल्हास, आनंद , सामर्थ्य व एकाग्रतेचे सुंदर उदाहरण म्हणजे दहीकाला उत्सव आहे. हा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या प्रकाराने साजरा केला जातो. समाजातील विविध घटकात यथानुशक्ती या सणात सहभागी होत असतात. असाच एक वेगळा सहभाग मुंबईतल्या पिक्सी आर्ट युनिसेक्स या सलूनने डोक्यावरील केसात दही हांडीवर आधारित कलाकृती सादर केल्या आहेत. तसेच पूरग्रस्तांना मदत करा असे ग्राहकांना आवाहन करत धार्मिक संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
हेअर डिझायनर्स आणि पिक्सी आर्ट युनिसेक्सचे विनोद कदम आणि त्याच्या टीमने या दहीकाला उत्सवात लहान मुलांच्या डोक्यावर मोफत कलाकृती काढल्या आहेत. यामध्ये दही हांडी व कृष्ण राधेच्या कलाकृती वेगवेगळ्या पद्धतीने आनंदाच्या छटा भरत आहेत. दरवर्षी काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा दृष्टीने पिक्सी आर्ट युनिसेक्स कलाकृती सादर करत असतात. त्यात यावर्षी काहीतरी सुंदर, वेगळे आणि चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचावा म्हणून त्यांनी बालगोपालांच्या केसांवर आकर्षक अशा कलाकृती काढल्या आहेत.
पिक्सी आर्ट युनिसेक्स टीमतर्फे केसांवरील या कलाकृती निशुल्क काढल्या जात आहेत. ज्या मंडळातील मुले कलाकृती काढण्यास येत आहेत त्या मुलांना व दही हांडी मंडळांना ही टीम पूरग्रस्त परिस्थितीतून सावरत असलेल्या कोल्हापूर आणि सांगलीकरांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनही करत असल्याचे विनोद कदम यांनी सांगितले.