मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण आणि समाजात मोठे परिवर्तन होईल, अशी घोषणा केली. ती म्हणजे आता लवकरच मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यात येणार आहे. या निर्णयाचे मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्वागत करत आता लहान वयातील प्रसूतीला आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा - 'लग्नासाठी २१ वर्षांची अट करण्याआधी मुलींना बारावीपर्यंत शिक्षण अनिवार्य करा' - मंगल खिंवसरा
आयव्हीएफ आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. नंदिता पालशेतकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 18 वर्षे हे लग्नाचे वय वाढवण्याची खरंच गरज होती. कारण 18 वर्षांत मुलीचे शिक्षणही पूर्ण होत नाही वा त्या प्रसूतीसाठी शारीरिक-मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अनेक मुलींना शिक्षण-कामाच्या अधिकारापासून दूर रहावे लागत आहे. तर 18-20 हे वय मुलीचे खरे तर बालपणच असते. शिकायच्या, बालपणाची अनुभूती घेण्याच्या वयात त्यांना आईपण जगावे लागते, असे म्हणत डॉ. पालशेतकर यांनी लहान वयातील प्रसूतीमुळे होणाऱ्या शारीरिक अडचणी मांडल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मृत्यूमध्ये लहान वयात होणाऱ्या मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे. तेव्हा आता लग्नाचे वय वाढवल्यास प्रसूतीचे वय ही वाढेल आणि मृत्यूला आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लहान वयातील प्रसूतीत मृत्यूचा धोका अधिक आहेच. पण त्याचबरोबर लहान वयातील प्रसूतीमुळे मुलींना अनेक आजार ही जडतात. रक्तदाब, अॅनिमियासारखे आजार होण्याची भीती अधिक असते. पण आता मात्र या समस्याही दूर होण्याची शक्यता आहे असेही डॉ. पालशेतकर म्हणाल्या.
हेही वाचा - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती