मुंबई - पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकांवर आलेल्या सौराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये लोहमार्ग पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई पोलिसांनी मुंबई सेंट्रल येथून १० लाख रुपयांचा पानमसाला, गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.
पोलिसांना मिळाली होती माहिती -
गुजरात राज्यातून लांब पल्ल्यांच्या गाडयातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व गुटखा विक्रीकरीता येत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विशेष कृती दलाचे सहायक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उप निरीक्षक दिपक शिंदे व स्टाफ यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे गुजरात राज्यातून आलेल्या सौराष्ट्र एक्सप्रेस गाडीच्या लगेज डब्यातून येत असलेल्या पार्सलमध्ये पानमसाला व गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सापळा रचून केली कारवाई -
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक ५ वर आल्यानंतर गाडीच्या लगेज डब्यातून बऱ्याच गोण्या फलाटावर उतरविण्यात आल्या. मालातील काही गोण्या एक व्यक्ती हमालाच्या मदतीने गेटलगत उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये गुटख्याच्या गोण्या चढवित असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोला हेरून मालासह व्यक्तीला ताब्यात घेतले.
१० लाख रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ -
पोलिसांनी केलेल्या कारवाईत, विमल पानमसाला, जाफरी पान मसाला वी -१ , जीकेबो तंबाकुजन्य पदार्थाच्या एकुण ५ लाख २४८ रुपये किंमतीच्या २१ गोण्या आणि वाहनासह एकूण १० लाख २४८ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - वृद्ध महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोनसाखळी केली लंपास, चोरटा गजाआड