मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई-सोलापूर व मुंबई-शिर्डी अशा या दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी येथून मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.
आर्थिक केंद्रे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे काम : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मोदी म्हणाले की, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रातली मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रे ही आपल्या धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पूर्ण झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मोठ्या गतीने देशात सुरू झाल्या आहेत. डबल इंजिन सरकारमुळे मुंबई व महाराष्ट्राचा विकास होत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विकासाच्या मार्गावर चालत आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती : मोदी पुढे म्हणाले की, देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोंचे जाळे वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. सह्याद्रीच्या घाटातून जेव्हा वंदे भारत एक्स्प्रेस जाईल तेव्हा तुम्ही प्रवासादरम्यान विलोभनीय सौंदर्य पाहू शकता. महाराष्ट्रात आलेल्या सोलापूर आणि शिर्डीला जाणाऱ्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना चालना देणाऱ्या ठरणार आहेत. सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनने तुम्ही अक्कलकोट व सिद्धेश्वर मंदिर आणि पंढरपूरचे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. तसेच शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमुळे शिर्डीत जाऊन साईबाबाचे दर्शन घेता येईल तसेच नाशिकमधील रामकुंड, प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि त्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेता येईल असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करणार - अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले असे काही लोक म्हणतात. महाराष्ट्राला रेल्वेसाठी 13 हजार 500 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. ही रक्कम याआधी कधीच मिळाली नाही. राज्यात पहिल्यांदाच ही रक्कम रेल्वेसाठी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. रेल्वे मंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की वंदे भारत या दोन्ही ट्रेनचा लोकार्पण करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत उपस्थित राहिले, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा : PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा