मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अभिभाषणाची सुरुवात किमान मराठीतून करायला हवी होती. राज्यपाल नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत हे आम्हाला ही माहीत आहे. पण अभिभाषणाची सुरुवात मराठीतून हवी. राज्य सरकारला याची जाणीव असायला हवी होती. राज्यसरकारने लिहून दिलेले भाषण ते वाचत होते. मग राज्य सरकारने भाषणाची सुरुवात मराठीतून का करून दिली नाही? त्यामुळे भाजपचे मराठी प्रेम बेगडी आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आम्ही नाराजी कळवणार आहोत, असे भाई जगताप म्हणाले आहेत. तसेच राज्यपालांनी अभिभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेही नाव चुकीचे घेतले, हे अजिबात योग्य नाही अशी टीकाही काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी: राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर मराठी भाषेला तो दर्जा मिळवून देण्यासाठी कोणताही पाठपुरावा दिसत नाही. तसेच मराठी भाषा दिनी राज्यपालांनी हिंदीत भाषण केले असले तरी राज्यपाल हे नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आहेत. त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यायला हवा असा सबुरीचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना इतर नेत्यांना दिला आहे.
मराठी दिनानिमित्ताने ग्रंथ दिंडी: कवी कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील निवासस्थानापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली आहे.
दिंडीत मराठी संस्कृतीचे दर्शन: मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीत कवी, साहित्यिक, लेखक यांच्यासह शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
म्हणून तात्यासाहेब कुसुमाग्रज झाले: कवी तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. तात्यासाहेबांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायासाठी ते नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण पिंपळगाव येथेच गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक लहान बहीण होती. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.