मुंबई - भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का आणि बहुमताचा आकडा कसा जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे वक्तव्य करत भाजपशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेची आता काय भूमिका असणार याकडे लागले आहे.
काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे.